उस्मानाबाद : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहातील चांदीच्या दरवाजाचा उंबरठाच काढून टाकण्यात आला आहे. मंदिर प्रशासनानं मंदिर सुधारणेच्या नावाखाली पुरातनं दरवाज्याचा उंबरा काढला.

नवरात्रौत्सवनंतर मंदिरातील गर्दी ओसरल्यानंतर पुजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. वास्तविक, नवरात्रौत्सव संपल्यानंतर मंदिरातील गर्भगृहाचा उंबरठा पुन्हा बसवणं अपेक्षित होतं, मात्र तसं न झाल्यानं पुजारी आणि भाविक नाराजी व्यक्त आहे.

मंदिराच्या गर्भगृहासमोरील चांदीचा दरवाजा 18 व्या शतकातला आहे. दरवाज्याच्या उंबऱ्यावर भाविक माथा टेकत होते. मात्र, आता उंबराच काढल्यानं चांदीचा दरवाजा रिकामा दिसतो आहे.

दुसरीकडे 100 रुपये मोजून व्हीआयपी पास घेणाऱ्या भाविकांना देवींच्या जवळ, तर दर्शन रांगेतल्या भाविकांना 10 फूट लांब अंतरावरुन दर्शन देण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भक्तांची लूट सुरु असल्याचा आरोप भाविकांकडून होत आहे.