पुणे : विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेले वारकरी आज देहूतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान करत आहेत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या तुकोबांच्या देहूनगरीत दाखल झाल्या आहेत.


 
तुकोबारायाच्या मंदिरातून निघून पालखी आज इनामदार वाड्यात मुक्कामी असणार आहे. यंदा 330 दिंड्या तुकोबांच्या पालखीत सहभागी होणार आहेत. यावर्षी पालखी सोहळा प्रस्थानाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, बबन लोणीकर, गिरीश बापट, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

 
तुकोबांनंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखीही उद्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. त्यामुळे आज आळंदीत शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत. माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीत मोठी गर्दी होतेय.


एकादशीपर्यंत पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद :



आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद करण्यात आली आहे. वारीनिमित्त सध्या पंढरपुरात भाविकांचा ओघ वाढत चालला आहे. रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

 
सध्याच्या घडीला दररोज 60 हजार भाविक विठुरायाचं दर्शन घेतात. अशावेळी व्हीआयपी रांगेतील लोकांना सोडल्यानंतर भाविकांकडून याला विरोध होतो. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना ताटकळत उभं राहू लागतं. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 
विठ्ठलाच्या दर्शन रांगेत राजूबाई राजानी यांचा मृत्यू झाल्यानंतर मंदिर प्रशासनाला जाग आलीय. आजपासून मंदिर परिसरात कायमस्वरुपी दोन अँब्युलन्स तैनात करण्यात आल्यात. तर दर्शन मंडपात चोवीस तास सेवा देणाऱ्या दवाखान्याची सुरुवात करण्यात आलीय.

 
शनिवारी दर्शन रांगेत राजूबाई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 'एबीपी माझा'नं हे वृत्त लावून धरलं होतं. त्याची दखल घेत मंदिर प्रशासनानं ही सुधारणा केलीय. याशिवाय मंदिर समितीच्या वतीनं कायमस्वरुपी हॉस्पिटल सुरु कऱण्याचा प्रयत्न आहे.