मुंबई/पालघर: पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये गेल्या 24 तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात डहाणूमध्ये 251 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 10 वर्षात डहाणू शहरात झालेला हा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

 

पश्चिम किनारपट्टीवरील अनुकूल हवामान या भागात विक्रमी पाऊस होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं सांगण्यात येत आहे.

 

येत्या 24 तासात राज्यभरात पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

 


पश्चिम महाराष्ट्रात जोर नाही

गेल्या 4 दिवसांपासून मुंबईसह उपनगरांवर मेहेरबानी दाखवणारा पाऊस  गावाकडच्या शिवारांवर अद्यापही रुसल्याचंच चित्र कायम आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा अनेक भाग मुसळधार पावसाची वाट पाहतोय. सुरुवातीच्या काळात रिमझिम सरी टाकून पावसानं ओढ दिली. त्यामुळे ज्यांनी पेरण्या उरकून घेतल्या ते शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. तर काही भागात जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्याच झालेल्या नाहीत.

 

दुसरीकडे मुंबईसह कोकणात गेल्या 4 दिवसात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हवामान विभागानं सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज अद्याप  खरा ठऱलेला नाही. त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसात पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर धो-धो बरसावा, अशी आशा आहे.

 

कोकणात संततधार

गेल्या 24 तासापासून कोकणकिनारपट्टीवर पावसाची संततधार सुरुच आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या शहरात गेल्या चोवीस तासात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वेंगुर्ल्यात सर्वाधिक 199 तर कुडाळमध्ये 97 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

 

या पावसामुळे कोकणातला बळीराजा मात्र चांगलाच सुखावला आहे. भातशेतीच्या कामांनी आता वेग घेतला आहे. आपल्या बैलजोडीला घेऊन शेतकरी मोठ्या जोमाने शेतात उतरलाय, आणि लावणीची कामांनाही आता सुरुवात झाली आहे.