मुंबई : दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये जमा करण्याचे आदेश राज्यातील सर्व देवस्थाने आणि धर्मादाय संस्थांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या विधी व न्याय विभागाने यासाठी परिपत्रक काढलं आहे. या आदेशाचे पालन करणं देवस्थान व धर्मादाय संस्थांना बंधनकारक आहे. देवस्थानांमध्ये राज्यातील सर्व मोठ्या देवस्थानांचा समावेश असेल.
देवस्थानांमार्फत काळा पैसा पांढरा होण्याची सरकारला भीती असल्याने हा नवा आदेश काढला असल्याचं बोललं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला काळा पैसा रोखण्यासाठी क्रांतिकारी पाऊल टाकत पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 24 नोव्हेंबरपर्यंत ठराविक ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र सरकार नजर ठेवून आहे.