मुंबई : काळा पैसा शोधण्याच्या नावाखाली सर्व सामान्यांना बँकेच्या रांगेत उभे करायचं आणि दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने 63 धनदांडग्या उद्योगपतींची 7016 कोटी रूपयांची कर्ज माफी करायची, हा प्रकार ‘सोनम गुप्ता’पेक्षा मोठी बेवफाई आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.


कर्जबुडव्या उद्योगपतींची हजारो कोटींचे कर्ज सरकार माफ करते, तर शेतकऱ्यांनाच कर्जमाफी का नाही, असा सवाल विचारत नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येणार असेल, तर या पैशातून शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी विखे पाटलांनी केली.

शेतीमालाला हमीभाव द्या - विखे पाटील

शेतकरी गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करत आहे. कसेबसे पिकवलेल्या मालाला हे सरकार भाव देऊ शकलं नाही, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पुरेशी भरपाई देऊ शकलं नाही, शासकीय खरेदी केंद्रे सुरु करु शकलं नाही, अशी टीकाही विखे पाटलांनी केली.