जळगाव: महिला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आता राज्यात दारुबंदीसाठी आंदोलन पुकारणार आहेत. काल जळगावमध्ये बोलत असताना त्यांनी यासंबंधी माहिती दिली. दारुमुळं महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महाराष्ट्र दारुमुक्त करण्यासाठी भूमाता ब्रिगेड मार्चपासून आंदोलन सुरु करणार आहे.
‘सुरुवातीला दारुबंदी आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करण्यात येईल. पण जर या आंदोलनाची सरकारनं दखल घेतली नाही तर मात्र, प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांना प्रवेश बंदी करु. तरीही सरकारनं आमचं ऐकलं नाही तर मात्र, मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनाच कोंडून ठेवू.’ असं भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे.
‘आम्ही जेव्हा महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं. त्यानंतर अनेक महिलांनी मला दारुबंदीसाठी आंदोलन करण्याची मागणी केली. दारुमुळे अनेक महिलांवर आज अत्याचार होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दारुबंदी केल्यास महिलांना नक्कीच अच्छे दिन येतील.’ असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.
‘महाराष्ट्रात जास्तीत जास्त दोन वर्षात पूर्णपणे दारुबंदी होऊ शकते. पण जर दारुबंदी झाली नाही तर मात्र, पुढच्या विधानसभेत भाजपचं सरकार दिसणार नाही. त्यामुळे भाजपला महिलांची मतं हवी असल्यास दारुबंदी करावीच लागेल.’ असं तृप्ती देसाई म्हणाले.
दरम्यान, अहमदनगरमधील पांगरमलच्या दारु कांडातील बळीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनावेळी तृप्ती देसाईंनी दारुबंदी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. ‘गृहमंत्र्यांनी राज्यातील सर्व अवैध धंदे बंद करावेत, नाहीतर गृहमंत्रीपद सोडावं.’ असंही त्यावेळी म्हणाल्या होत्या.
संबंधित बातम्या: