नवी मुंबई : नवी मुंबईतल्या 4 वर्षांच्या चिमुकलीला वाचवण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आराध्या मुळे या 4 वर्षांच्या चिमुकलीला हृदयाचा आजार झाला आहे आणि तिला वाचवण्यासाठी हृदय प्रत्यारोपण करण्याची गरज आहे.

आराध्याला अजून तरी कुणीही अवयव दाता मिळालेला नाही. त्यामुळे अवयव दाता मिळावा आणि अवयव दानाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आराध्याच्या वाढदिवसालाच बाईक रॅली काढण्यात आली.

कळंबोली ते वाशी दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीत मुंबईकरांनी सहभाग घेतला. शिवाय आराध्याला अवयव दाता मिळावं, यासाठी राज्यातील विविध ठिकाणी अवयव दान जागृतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

राज्यभरासह देशातील अनेक ठिकाणांहून तरुणाई या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे. ‘सेव्ह आराध्या’ या अभियानाअंतर्गत आराध्यासाठी अवयवदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

सध्या आराध्याचं 10 टक्के हृदय काम करत आहे. तिला दर 15 दिवसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत. तिच्यावर नवी मुंबईच्या ऐरोलीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरु आहेत.

हृदय दान कोण करु शकेल?

आराध्याला फक्त ब्रेन डेड (मेंदू-मृत) रुग्ण हृदय दान करु शकतो. अवयव दात्याचं वजन हे 25 ते 30 किलो असणं आवश्यक आहे. तर रक्तगट A+, A-, O+, O- यापैकी एक असणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडिओ :