मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. सकाळी अकरा वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशन सुरु होईल. पुढच्या शनिवारी म्हणजे 18 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.


7 एप्रिलपर्यंत विधीमंडळाचं अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण 23 विधेयकं सादर केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे विरोधकही नोटाबंदी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मराठा आरक्षण, ईव्हीएम घोळ, आमदार प्रशांत परिचारकांचे वादग्रस्त वक्तव्य यासारख्या काही मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

या अधिवेशनात प्रलंबित दोन विधेयके, सहा अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश 2017, (दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या प्रयोजनासाठी महानगरपालिकेची जागा देता यावी, यासाठी तरतूद), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (अंतिम विकास आराखड्यामध्ये व प्रारुप विकास आराखड्यामध्ये दर्शविलेल्या जमिनीच्या वापरानुसार जमीन महसूल संहिता यामधील जमीन वापराचे रुपांतरण करण्याबाबतच्या तरतुदीत सुधारणा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (अनधिकृत इमारतींवर बसविण्यात येणारी शास्तीच्या रकमेत सुधारणा करण्यासाठी अशी शास्ती मालमत्ता कराच्या दुप्पटीपेक्षा महानगरपालिका ठरविल अशी असेल अशी तरतूद करणे),  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य संख्येमध्ये सहावरून आठ एवढी वाढ करणे), महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयं-प्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) आणि मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०१७ (महानगरपालिका व नगरपरिषदा यांच्या निवडणूका लढविणाऱ्या उमेदवारांना शौचालय वापराचे स्वयंप्रमाणपत्र देण्याबाबत तरतुदी) ही विधेयके मांडण्यात येणार आहेत