Trupti Desai Statement on Supriya Sule: सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात मी बारामतीतून (Baramati) निवडणूक लढवणार, अशी घोषणा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केली आहे. तसेच, सुप्रिया सुळे या जर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार असतील, तर मी भाजपकडून (BJP) निवडणूक लढवण्यास इच्छुक असेल, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या. एवढंच नाहीतर, जर सुप्रीय सुळे भाजपात गेल्या, तर मी महाविकास आघाडीची उमेदवार असणार, असा दावाही तृप्ती देसाईंनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी काल शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना थेट सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचीच घोषणा केली. 


तृप्ती देसाई म्हणाल्या की, "साईबाबा हे अनेकांच श्रध्दास्थान आहे, ते कुठल्या जाती पातीचे नाहीत. त्यांना अनेकजण देवाच्या स्वरूपात पुजतात, मात्र साईबाबांविषयी कोणीही उठून, त्यांना एका विशिष्ट जातीचे असल्याचा दाखविण्याचा,  ठरवण्याचा प्रयत्न करतायत.", असं त्या म्हणाल्या. तसेच, सर्वधर्मीयांचं श्रध्दास्थान असलेल्या साईबाबांविषयी भावना दुखावल्या जातील, असं वक्तव्य करणं थांबवावं आणि सरकारनं अशी वक्तव्य करणाऱ्यांविरोधात दखलपात्र गुन्हे दाखल करावेत, जेणे करुन साईबाबांविषयी कोणी बोलायची हिंमत करणार नाही, असं मत तृप्ती देसाई यांनी शिर्डीत साईदर्शनानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय.


अजित पवार तुमचे भाऊ, मग तुम्हीही त्यांच्यासोबत भाजपमध्ये जा : तृप्ती देसाई 


राज्यातील राजकारण सध्या कोणत्या दिशेनं चाललंय? असा सवालही यावेळी तृप्ती देसाई यांनी उपस्थितीत केलाय. अजीत पवार हे भारतीय जनता पार्टीसोबत गेले, दुसरीकडे सुप्रिया सुळे म्हणतात आमच्या राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. तुमच्या राष्ट्रवादीत फूट पडली नाही, असं म्हणतायत, मात्र जनतेच्या पायात बुट आहे ना, तो बुट जर आता मतांद्वारे तुम्हाला पडला की, मग तुम्हाला कळेल. लोकांना फसवता येणार नाही. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट बोला, ते तुमचे भाऊ आहेत, तर तुम्ही त्यांच्या बरोबर भाजपात जा.", असा सल्लाच तृप्ती देसाई यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.  


सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून निवडणूक लढवणार : तृप्ती देसाई 


"सुप्रिया सुळे तीन वेळा बारामतीतून खासदार झाल्या आहेत. यावेळी मला वाटलं होतं राष्ट्रवादी एखाद्या कार्यकर्त्याला बारामतीतून संधी देईल मात्र सुप्रिया सुळे स्वतःचीच तयारी करत आहेत. त्याच्या मतदार संघात अनेक कामं अद्यापही झालेली नाहीत, लोकांना त्यांचं नेतृत्व मान्य नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात मी बारामतीतून लोकसभा लढवणार आहे, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. सुप्रिया सुळे जर महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्या तर भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी घेण्यास इच्छुक असेल, असंही तृप्ती देसाई म्हणाल्या. भाजपनं माझ्या सारख्या कार्यकर्तीला उमेदवारी दिली, तर नक्कीच बारामतीत बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. बारामतीसाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून मला फोन आले आहेत. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पहाता मी पुढील चर्चा केलेली नाही, असंही त्या म्हणाल्या. अशातच, सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार तर मी भाजपची आणि जर त्या भाजपात गेल्या तर मात्र मी महाविकास आघाडीची उमेदवार असणार, असा दावाही तृप्ती देसाई यांनी केला आहे.


दरम्यान, तृप्ती देसाई यांनी थेट सुप्रिया सुळेंविरोधात आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तसेच, तृप्ती देसाईंनी थेट पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनाच आव्हान दिल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.