मुंबई : कथित टीआरपी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. पार्थो यांना 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे. दरम्यान त्यांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागेल. तपास अधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा तिथं हजर राहून तपासात सहकार्य करणं दासगुप्ता यांना अनिवार्य राहिल. तसेच पहिले सहा महिने महिन्याच्या पहिल्या शनिवारी तपास अधिका-यांकडे हजेरी लावणं पार्थो यांना बंधनकारक राहीलं. त्यानंतर दर तीन महिन्यांनी पहिल्या शनिवारी त्यांना तपास अधिका-यांकडे हजेरी लावण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. त्याचबरोबर खटल्यातील अन्य साक्षीदारांशी संपर्क सधणं किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणण्यासही दासगुप्ता यांना मनाई करण्यात आली आहे.
'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थो दासगुप्ता हेच या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सांगत मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला होता. कथित टीआरपी घोटाळाप्रकरणी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल(बार्क)चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांना पुण्यातून 24 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी नवी मुंबईतील तळोजा कारागृहात करण्यात आली होती. मात्र, 15 जानेवारी रोजी दास यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र 22 जानेवारी रोजी त्यांची रुग्णालयातून पुन्हा तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यामुळे नंतर गुणवत्तेच्या आधारावरच दासगुप्ता यांच्यावतीनं जेष्ठ वकील आभात पोंडा यांनी युक्तिवाद केला.
त्यानंतर दासगुप्ता यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत प्रकृतीच्या कारणास्तव दोन आठवड्यांच्या तातडीच्या जामीनाची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली. पार्थो हे 60 दिवसांहून अधिक काळ तुरूंगात आहेत तसेच पार्थो सोडून या प्रकरणातील सर्वच आरोपी हे जामीनावर बाहेर असल्याचंही पार्थोच्यावतीनं न्यायालयाच्या निर्दशानास आणून देण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :