गडचिरोली : गडचिरोलीत काल (13 मार्च) आदिवासी सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात 16 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसह एकूण 119 जोडप्यांनी लगीनगाठ बांधली. हा सोहळा गडचिरोलीच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी ठरला. अतिसंवेदनशील आणि मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजासाठी असे विवाह सोहळे गरजेचे असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलं. 


जिल्हा पोलीस दल आणि नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेने अभिनव लॉन गडचिरोली इथे हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. आदिवासी समाजातील इच्छुक वर-वधूंना लग्नाचा अवाढव्य खर्च सोसावा लागू नये यासाठीचा हा प्रयत्न होता. एकूण 119 जोडप्यांनी विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. तर पोलीस दलाच्या पुढाकाराने 16 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनीही लग्नगाठ बांधली.


या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी धानोरा, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, पेंढरी, अहेरी, एटापल्ली, हेडरी, भामरागड, जिमलगट्टा अशा दहा झोनमधून जोडप्यांची निवड करण्यात आली होती. सोहळ्याच्या आधी सकाळी वधू वरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शहर सनई चौघड्यांनी दुमदुमलं होतं. वऱ्हाडी मंडळींसह कार्यक्रमाच्या नियोजनात आणि बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घरचाच कार्यक्रम असल्याच्या आनंदात गाण्यांवर ठेका ठरला. 


या सोहळ्याला मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य भेंडे, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मार्गदर्शन केलं. 


संसारोपयोगी साहित्य भेट
विवाहित जोडप्यांना कपडे, पादत्राणे, संसारोपयोगी साहित्य, नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आदींचे वितरण करण्यात आले. विवाहासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. आदल्या दिवशी आलेल्या जोडप्यांची राहण्याची व्यवथा केली होती. 


मुलांनीही बघितला आई-वडिलांचा विवाह
काही जोडपी आधीपासूनच 'लिव्ह-इन'मध्ये राहत होती. त्यामुळे या आदिवासी जोडप्यांपैकी अनेकांना एक किंवा दोन मुले होती. त्यांची मुलेही त्यांच्या विवाहाची साक्षीदार ठरल्याने हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला.


पालघरच्या विक्रमगडमध्ये मनसेतर्फे सामूहिक विवाह सोहळा
विक्रमगड इथे रविवारी (13 मार्च) मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेला भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.  साडे सातशेपेक्षा अधिक आदिवासी दाम्पत्यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धर्मपत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले. शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते अभिजीत पानसे, आमदार राजू पाटील यांनीदेखील उपस्थिती लावली. साडे सातशेपेक्षा जास्त नवदाम्पत्यांना यावेळी जीवनावश्यक साहित्याचं वाटप देखील मनसेतर्फे करण्यात आलं. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी एका नवदाम्पत्याचं कन्यादान केलं. ही भावना बोलता न येण्यासारखी असल्याच शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या. तसंच जव्हार, मोखाडा , विक्रमगड या ग्रामीण भागात रोजगाराची कमतरता असल्याने लग्न आम्ही करुन देऊ मात्र सरकारने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असा खोचक टोला यावेळी शर्मिला ठाकरे यांनी लगावला. पालघरमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचं आवाहन यावेळी त्यांनी सरकारला केलं.