मनमाड : नाशिकच्या चांदवड तालुक्यात पानी फाऊंडेशन अंतर्गत श्रमदान करणाऱ्या गावकऱ्यांवर आदिवासींच्या जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून जमावाने 5 ते 6 मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न केला. जखमींना उपचारासाठी चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


दुष्काळावर मात करण्यासाठी चांदवड तालुक्यात पानी फाऊंडेशनचं श्रमदान सुरु आहे. पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत चांदवड तालुक्यातील 72 गावांनी भाग घेतला आहे. त्यानुसार आज मतेवाडीमधील गावकऱ्यांनी डोंगरउतारावर चर खोदण्याचं काम सुरु केलं.

मात्र त्यावेळी तिथे वनजमीन कसणाऱ्या आदिवासींनी अचानक ग्रामस्थांवर हल्ला केला. आदिवासींच्या जमावाने काठ्या आणि दगडांनी गावकऱ्यांवर हल्ला केला. यात चार गावकरी जखमी झाले तर त्यांच्या सात मोटारसायकल जाळण्याचा प्रयत्न आदिवासींनी केला. एवढचं नाही तर पोकलंडच्या काचाही फोडल्या.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. तर जखमींना उपचारांसाठी तातडीने चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु आदिवासींनी हल्ला का केला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.