Pune Transgender Raju Doiphode : पुण्यातील महानगरपालिकेची सुरक्षा (Transgender) 10 तृतीयपथींयांच्या हाती काही दिवसांपूर्वीच सोपवण्यात आली. त्यातील प्रत्येकांचा आतापर्यंत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी लढा सुरू होता. मात्र महानगरपालिकेने त्यांना नोकरी देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातीलच एक असलेले राजू दिनकर डोईफोडे यांना नोकरीबरोबरच कीर्तनकार म्हणून समाजप्रबोधन करायचं आहे. त्यांना किर्तनाची पार्श्वभूमीदेखील आहे आणि त्यांनी संत साहित्याचं शिक्षणही घेतलं आहे. 


नववीत कीर्तनाचे धडे गिरवले...


पुरूषांसोबतच स्त्रियासुद्धा कीर्तनक्षेत्रात उतरत असताना तृतीयपंथी म्हणून मला कीर्तन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावं, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. ते लहान असताना त्यांना फासशी कसलीही माहिती नव्हती. मात्र वयानुसार त्यांना त्यांच्या शरिरातील आणि मनातील बदल दिसत होते.संत साहित्याचं शिक्षण घेत असताना आणि वारकरी सांप्रदायात आल्यानंतर त्यांच्यात बदल घडेल,असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी जोग महाराज शिक्षण संस्थेत नववी इयत्ता असताना त्याने प्रवेश घेतला आणि कीर्तनाचे धडे गिरवले. 


शाळेतील मुलं चिडवायचे म्हणून कीर्तन सोडलं!


कीर्तनाचे धडे गिरवत असतानाच त्याचं वागणं आणि बोलणं पाहून शाळेतील मुलं त्यांना चिडवत होते. त्यानंतर बालवयात अशा प्रकारची वागणूक पाहून त्यांना चीड यायची. त्यांनी आपली ओळख अनेकदा लपवायचा प्रयत्न केला. मात्र एका टप्प्यानंतर त्यांनाही त्यांची ओळख लपवता आली नाही.बाह्य रंगाने किती जरी पुरुषार्थ केला तरीही अंतरंग सांगतं तेच केलं पाहिजे आणि तेच मी केले, असं ते सांगतात. 


कालांतराने घर सोडलं अन् रस्त्यावर पैसे मागितले पण...


महाराष्ट्राला शेकडो वर्षांची कीर्तनाची परंपरा आहे. मात्र कीर्तनाचं शिक्षण घेत असताना ते इतरांपेक्षा वेगळे असल्याचं कळलं आणि त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण बंद केलं. त्यानंतर त्यांनी घरही सोडण्याचा आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतला आणि बाकी सगळ्या तृतीयपंथीयांसारखंच त्यांनी रस्त्यावर पैसे मागायचा सुरुवात केली. त्यातूनच त्यांचा आतापर्यंतचा उदरनिर्वाह सुरु होता. 


सगळ्यांनी स्विकारण्याची गरज...


आता नोकरी मिळाली आहे. आम्हा सगळ्या तृतीयपंथीयांना स्विकारण्याचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे मला आता नोकरीसोबतच कीर्तनही करायचं आहे. मात्र यासाठी आता सगळ्यात जास्त समाजाचं आणि कुटुंबियांचं प्रोत्साहन हवं आहे. मलाही समाजासाठी काम करायचं आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत स्त्री आणि पुरुषांनी समाज प्रबोधनाचं काम केलं तसं तृतीयपंथीयांनीही करावं आणि आम्हालाही किर्तनकार म्हणून स्विकारावं, अशी इच्छा राजू यांनी व्यक्त केली आहे. 


  हेही वाचा-