वर्धा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नोकरभरतीत होणारी थेट मुलाखत पद्धत बंद करण्यात आली आहे. आता लेखी परीक्षा घेऊनच निकाल जाहीर करण्यात येत असून, ज्यांची पात्रता असेल त्यांनाच नोकरी मिळेल, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं.


वर्धा बसस्थानक नुतनीकरणाच्या सात कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन रावते यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

विशेष म्हणजे, अनुकंपा तत्त्वावर घेणाऱ्या महिलांनाही गुणवत्तेच्या आधारावरच प्राधान्य दिलं जाणार, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

रावते म्हणाले की, "परिवहन मंडळाच्या नोकरभरतीत आता लेखी परीक्षा घेऊन, परीक्षार्थींना लगेच निकाल देण्यात येत आहेत. त्यामुळे आता माझ्यासह कोणाचा वशिला नोकारीसाठी चालणार नाही. ज्याची पात्रता असेल, त्यालाच नोकरी मिळणार आहे."

नोकरभरतीतील वशिलेबाजीवर बोलताना रावते म्हणाले की, "आता आपलं सरकार आलं आपली माणसे लावायची आहे, असे म्हणणारे आमदार माझ्या या निर्णयामुळे नाराज आहेत. पण हे सगळं बाळासाहेब ठाकरेंच्या संस्करातून आलं, आणि हा निर्णय मी घेतला."

या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, अनिल सोले आदींची उपस्थिती होते.

दरम्यान, परिवहन मंडळाच्या नोकरभरतीतची प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच या नोकरभरती प्रक्रियेत चालक आणि वाहक पदासाठी दहावी उत्तीर्ण, लिपिक आणि टंकलेखक पदासाठी पदवी परीक्षा, आणि सहाय्यक पदासाठी संबंधित विषयातील आयआयटी परीक्षा उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक पात्रता निश्चित ठेवण्यात आली आहे.