सांगली : सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येनंतर कुटुंबीयांचं सांत्वन करायला गेलेल्या पोलिसांवर तोंड लपवण्याची वेळ आली. अनिकेतच्या मुलीने 'मम्मी, यांनीच पप्पांना मारलं का?' असा प्रश्न विचारल्यानंतर पोलिसांची मान शरमेनं खाली गेली.

अनिकेत कोथळेच्या मृत्यूनंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि सीआयडी प्रमुख बिपीन बिहारी यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी दोघांनी अनिकेतचे आई-वडील, पत्नी यांचं सांत्वन केलं.

अनिकेतच्या आईनं नराधम मारेकऱ्यांना फाशीच द्यावी अशी मागणी सीआयडी प्रमुख बिपीन बिहारी यांच्याकडे केली. यावेळी अनिकेत कोथळेच्या मुलीनं आईला विचारलेला प्रश्न ऐकून पोलिसांची मान शरमेनं खाली झुकली असेल.

अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलिसांचं निलंबन झालं आहे. ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस आणि रात्री ड्यूटीवर असणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांचं निलंबन झालं आहे.

अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना दमदाटी, जबरदस्ती करुन पैसे उकळण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. यातील अनिकेत कोथळेवर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापरल्यामुळे, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली होती.

विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, या दोन्ही आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

सांगलीतल्या लकी बॅग हाऊसमध्ये अनिकेत नोकरी करत होता. त्या ठिकाणी बनवल्या जाणाऱ्या अश्लिल सीडींचा सुगावा अनिकेतला लागल्यानं त्याची हत्या केली गेली, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

अनिकेतच्या हत्येची सुपारी पोलिसांनाच दिल्याचा दावा अनिकेतच्या भावाने केला. त्यामळे या सेक्स रॅकेटशी संबंधित दोघांना ताब्यात घेतलं असून, त्यांची चौकशी होणार आहे.

संबंधित बातम्या


अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आणखी 7 पोलीस निलंबित


कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?


अश्लील चित्रिकरणाचा पर्दाफाश केल्याने अनिकेतची हत्या?


मालकाशी वादाचा अनिकेत कोथळेच्या हत्येशी संबंध?


सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू