पंढरपूर : गेल्या 43 दिवसांपासून अकलूज-माळेवाडी व नातेपुते नागरीकांच्या सुरु असलेल्या लढ्याला आज यश मिळाले. शासनाने दिलेल्या मुदतीला चार दिवस बाकी असताना आज नगर विकास खात्याने अकलूज-माळेवाडी नगर परिषद व नातेपुते नगर पंचायत गठीत केल्याचा आदेश काढला असून यावर जनतेच्या एकीचा विजय झाला आहे.गेल्या 22 जून पासून अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर तीनही गावच्या नागरीकांनी नगर परिषद व नगर पंचायतीची मंजूरी मिळेपर्यंत उपोषण सुरु केले होते. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अकलूजला नगरपालिकेचा तर नातेपुतेला नगरपंचायतीचा दर्जा बहाल केला आहे.
या उपोषणाला चिञा वाघ, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. राम सातपुते, आ. प्रशांत परिचारक यांनी पाठिंबा दिला होता. माजी उपमुख्यमंञी विजयसिंह मोहीते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, माळेवाडी नातेपुतेचे सरपंच, उपसरपंच, बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे व इतर नागरिकांचे शिष्टमंडळ नगर विकास मंञी एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाऊन भेटले होते. त्या अगोदर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उपोषण व आंदोलन काळात यावर दोनदा सुनावणी झाली. पहिल्या सुनावणीत शासनाने आपली बाजू मांडली नसल्याने त्यांना न्यायालयाने बाजू मांडण्याचा आदेश दिला. दुसऱ्या सुनावणीत शासनाने तीन आठवङ्यांचा वेळ मागून घेतला.
उपोषण काळात शासनाचा दहावा घालण्यात आला. जागरण गोंधळ करण्यात आला. उपोषणास तालुक्यातील सुमारे 165 संघटनांनी पाठींबा दिला. गेल्या 43 दिवसांमध्ये सुमारे दहा हजार वीस लोकांनी आंदोलनात भाग घेतला. शिवसेना, भाजपा व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता . शासनाच्या निर्णयानंतर अकलूजमध्ये फटाक्यांची आतिषाबजी करून शहरात मिठाई वाटण्यात आली. फटाके फोडण्यात आले.
अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर व्हावे यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी अकलूजमध्ये अनेक वेळा आंदोलनेही करण्यात आली. अखेर यासंदर्भात आज निर्णय घेण्यात आला आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर होण्याला अजित पवारांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र हा विरोध डावलून एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.