भंडारा : नैराश्यातून एका वाहतूक पोलिसाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. रतन वालदे असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी मृतक वालदे हे ड्युटीवर न जाता शहरातील केशलवाडा परिसरालगत असलेल्या कालव्याजवळ जाऊन, त्यांनी विष प्राशन केले.
परिसरात मृतदेह पडला असल्यामुळे ग्रामस्थांनी भंडारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी प्रथम दर्शनी शहानिशा केल्या नंतर ते वाहतूक पोलीस शिपाई रतन वालदे असल्याचे लक्षात आले.
घटनास्थळावरून पोलिसांनी दुचाकी तसेच विष आणि सुसाईड नोट जप्त केली. आपल्याच विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती सुसाईड नोटमध्ये आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मृत वाहतूक पोलिस रतन वालदे यांच्या सहकाऱ्याच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रतन वलदे हे नैराश्याने ग्रासले होते.
रतन वालदे यांच्या आत्महत्येमुळे भंडारा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, भंडारा पोलिसांनी या घटनेवर मौन बाळगलं आहे. तर रतन वालदे यांचे सासरे आणि साले हे देखील पोलिसात खात्यात नोकरी करत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनीही याबाबत बोलणे टाळले असल्याने आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.
तपासाअंती सत्य समोर आल्यावर आपली बाजू व्यक्त करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.