हिंगोली : हिंगोली शहरांमध्ये ट्रॅफिक पोलिसांतर्फे आज चेकिंग मोहिम चालू होती. दरम्यान एका नेत्याच्या चारचाकी वाहनावर फॅन्सी नंबर टाकलेला असल्यामुळे वाहतूक पोलीस त्या वाहनांवर कारवाई करत होते. तेव्हा आमदार तान्हाजी मुटकुळे यांची गाडी तेथून जात होती. आमदारचा ड्रायव्हर पांडे याने ट्रॅफिक पोलिसांजवळ येऊन तुम्ही या गाडीवर चालन का करत आहात. ते सेनगावचे आमचे नेते आहेत, जाऊ द्या त्यांना. नाहीतर पाहुन घेऊ, अशी धमकी पोलिसांना तान्हाजी मुटकुळे यांच्या ड्रायव्हरने दिली.


त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पोलीस कामात हस्तक्षेप केल्यामुळे व सीटबेल्ट न लावल्याने जागेवरच 138, 177 कलमान्वये आमदारांच्या गाडीवर दंड ठोठावला. या महिनाभरात आमदाराच्या गाडीला दुसऱ्यांदा दंड लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तान्हाजी मुटकुळे हे सध्या हिंगोली विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षाकडून विद्यमान आमदार आहेत.



या महिन्यात 14 जुलै रोजी आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या गाडीवर दंडात्मक कारवाई केली होती. हिंगोली शहरातील गांधी चौकामध्ये असलेल्या चौधरी पेट्रोल पंपाकडे जाताना गाडी चुकीच्या दिशेने वळवली म्हणून वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांने ऑनलाईन दोनशे रुपयांचा दंड ठोठावला होता. आमदार तान्हाजी मुटकुळे यांची कार एमएच -38 व्ही -4499 अकोला रस्त्याने येऊन चौधरी पेट्रोल पंप कडे डिझेल भरण्यासाठी जात होती. कार चालकाला वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी इशारा करून वाहन निश्चित केलेल्या वळणावरून वळविण्याची सूचना केली होती. परंतु चालकाने पोलिसांचे काहीही न ऐकता वाहन थेट पेट्रोल पंपावर नेले. मात्र नियम मोडल्यानंतर वाहतूक शाखेच्या पथकाने वाहन अडवून त्यांना दोनशे रुपयाचा दंड ठोठावला.


गेल्या महिन्यात आमदार तान्हाजी मुटकुळे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्यावर करत असलेली कार्यवाही थांबवण्याची मागणी केली होती. तसेच वाहतूक शाखेच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.