मुंबई : कोकणात (Konkan) गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील (Mumbai) गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. उद्यापासून (दि.07) सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंगळवारपासून मोठ्या संख्येने गणेश भक्त कोकणात जायला निघाले आहेत. तसेच कोकणासाठी एसटीच्या जादा बसेस (ST Bus) सोडण्यात आल्या आहेत. तसेच खासगी वाहनांची संख्या देखील वाढल्याचे मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे चित्र आहे. 


मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जॅम


मुंबईकडून लाखो गणेश भक्त कोकणात गावी येण्यासाठी सज्ज झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात ट्रॅफिक जॅम झाली आहे. आज सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसमोर विघ्नच विघ्न येत असल्याचे चित्र आहे. मुंबई गोवा महामार्गावर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. 


पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा


तर पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी चालल्यामुळे पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर मोठा ताण पडत आहे. बोरघाट पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेनवरून वाहतूक सुरू करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 


खंबाटकी घाटात वाहतूक विस्कळीत


दरम्यान, साताऱ्यातील खंबाटकी घाटात देखील वाहतूक विस्कळीत कोंडी झाल्याचे चित्र आहे. खंबाटकी घाट चढताना दोन ट्रक अचानक बंद पडल्याने गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घाटात दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ट्रक बंद पडलेल्या ठिकाणी पोलीस आणि क्रेन दाखल झाल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. 


घोडबंदर रोडवर अपघात


तर, नंदुरबार डेपोवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसला घोडबंदर रोडवर अपघात झाला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट दुभाजकावर चढल्याने अपघात झाला. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा पुलावर ही घटना घडली. यामुळे मानपाडा पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर वाहन चालक फरार आहे. अपघातस्थळी वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. दोन क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. अपघातावेळी एसटीमध्ये प्रवासी नसल्याची माहिती आहे. 


आणखी वाचा 


कशेडी घाटात कोकणात जाणाऱ्या दोन बसचा मोठा अपघात; कंटेनरनं अचानक ब्रेक मारल्यामुळे दुर्घटना