Mumbai: राज्यातील तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे म्हणून कौशल्य विकास विभागानं मोठी घोषणा केली आहे. मंत्रालयात आज कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आलाय. या कराराअंतर्गत कंपनी राज्यातील 45 आयटीआय संस्थांमध्ये हलक्या वाहन तंत्रज्ञ (LMV) अभ्यासक्रमासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार आहे. प्रयोगशाळांसोबत शिक्षकांचे प्रशिक्षणही कंपनीकडूनच दिले जाणार असून, या उपक्रमामुळे सुमारे 8 हजार विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

Continues below advertisement


नेमके होणार काय?


-हा करार पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे. टोयोटाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रमजी गुलाठी यांनी सांगितले की कंपनी पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असून, मार्च 2026पर्यंत पहिल्या टप्प्यात 13 प्रयोगशाळा सुरू केल्या जातील. उर्वरित प्रयोगशाळा तीन टप्प्यांत सुरू केल्या जातील.


-कौशल्य विकास विभागाचा उद्देश केवळ प्रमाणपत्राधारित शिक्षण न देता विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्य, साधनांचा प्रत्यक्ष अनुभव आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांची नोकरीयोग्यता वाढेल आणि राज्यात कुशल मनुष्यबळाची निर्मिती होईल, असा विश्वास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. 


-या करारान्वयेटोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनी राज्यातील 45 आयटीआय संस्थांमध्ये हलक्या वाहन तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज प्रयोगशाळांची उभारणी करणार असून तिथल्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सुमारे 8 हजार आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.


-करारावर कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम गुलाठी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मंत्री लोढा यांनी उद्योगक्षेत्राचा सहभाग वाढल्याने आयटीआयच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होईल, असं सांगत या उपक्रमाचे स्वागत केले.


-आयटीआयच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, उद्योगकडून मिळणारा अनुभव आणि एकत्रित सहभागामुळे विद्यार्थ्यांना थेट रोजगाराच्या मार्गावर आणण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारचे आणखी रोजगारकेंद्रित करार लवकरच होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


-करार सोहळ्यास अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, DVETचे सहसंचालक सतीश सूर्यवंशी, टोयोटाचे उपाध्यक्ष रमेश राव, HR व्यवस्थापक भास्कर पै आणि मुख्य व्यवस्थापक रवी सोनटक्के हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


-या करारामुळे राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ऑटोमोबाईल तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार असून, रोजगाराच्या दृष्टीने त्यांना मोठा फायदा होणार आहे. 45 आयटीआयमध्ये उभारल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा, शिक्षक प्रशिक्षण आणि उद्योगाशी थेट संलग्नता हे सर्व मिळून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.