औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा ही पर्यटनस्थळे 10 डिसेंबरपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे तसेच महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुली करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर ही पर्यटनस्थळे खुली करण्यात येणार आहेत.


जिल्ह्यातील पर्यटनस्थळे सर्व खबरदारीच्या उपाययोजनांसह सुरू करण्यात येतील जेणे करून पर्यटनस्थळावर अवलंबून असणारे गाईड, दुकानदार, स्थानिक कारागीर, हॉटेल चालक, वाहतुक व्यवसाय करणारे ट्रान्सपोर्ट कंपनी यांना रोजगार मिळेल. या सर्व संबंधितांची कोरोना चाचणी त्या-त्या पर्यटनस्थळाच्या ठिकाणी करण्याची सुविधा संबंधित यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.


जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ व अजिंठा या स्थळांवर दर दिवशी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहणार असून दर दिवशी सकाळी एक हजार आणि दुपारच्या सत्रात एका हजार अशा एकुण दोन हजार याप्रमाणे पर्यटकांना दरदिवशी मर्यादित प्रवेश दिला जाईल. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन किंवा क्यु आर बस तिकिटांची नोंदणी करता येईल. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. कुठल्याही परिस्थितीत पर्यटनस्थळांवर वेळेवर तिकिट काढता येणार नाही.


तसेच पर्यटनस्थळी टुरिस्ट गाईड यांच्याद्वारे पर्यटकांना संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेणे महत्वाचे असून यादृष्टीने पर्यटनस्थळे सुरळीतपणे सुरू ठेवण्यात प्रशासनासह टुरिस्ट गाईडची जबाबदारी व भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी. तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणेने व पोलिस विभाग यांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहुन पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.