मुंबई: फटाके फोडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वेळेची मर्यादा घालून दिली आहे. मात्र नागरिक सुप्रीम कोर्टाच्या नियमाचे पालन करताना दिसत नाहीत. मुंबईतील मानखुर्दमध्ये दिवाळीनिमित्त मध्यरात्री मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाऱ्या दोन जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली.


महाराष्ट्रनगरमध्ये राहणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी 7 तारखेला मध्यरात्री फटाके फोडणाऱ्या 2 जणांवर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वेळेची मर्यादा न पाळता मोठे आवाजाचे फटाके फोडणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ बनवून त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी या व्हिडीओच्या मदतीने 8 तारखेला श्याम धीरु खालीदिया आणि सुनील रमेश पगारे या दोघांना अटक केली. दोघांची नंतर जामिनावर मुक्तताही करण्यात आली आहे.

आपण ताकीद देऊनही हे तरुण मुद्दाम फटाके फोडत होते, त्यामुळे आपल्याला त्रास झाल्याने तक्रार दिल्याचे तक्रारदाराने सांगितले. या दोन तरुणांवर कलम 188 , 34 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 यू अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.