नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा गो वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं. मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. मा गो वैद्य यांचं निधन यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्र्यांपासून राज्यातील भाजप नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


ज्ञानसागर, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले! : देवेंद्र फडणवीस


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ चिंतक, ज्येष्ठ संपादक-विचारवंत मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला आम्ही सारे मुकलो आहोत. बाबुराव शतायुषी होतील, ही खात्री होती. पण, काळाने त्यांना आमच्यातून हिरावून घेतले. त्यांच्या जाण्याने ज्ञानसागर, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.


आपल्या शोकसंदेशात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, संस्कृत भाषेचे अगाध ज्ञान, कोणताही किचकट विषय सहजसोपा करून सांगण्याचे कसब, मराठी भाषा आणि व्याकरणावरील सिद्धहस्त लेखक अशी कितीतरी बिरूदं अपुरी पडतील, इतकं अथांग व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे समाजमन पाहत असे. केवळ संघसेवा नव्हे तर संघविचार रूजविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यासाठी हालअपेष्टाही सहन केल्या, अशा मा. गो. वैद्य यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि ती कधीही भरून न निघणारीच अशीच आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची श्रद्धांजली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.
संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. 'नागपूर तरुण भारत'चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.


मा. गो. वैद्य यांच्या निधनामुळे ज्ञानदीप मालविला : राज्यपाल


महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विचारवंत व तरुण भारतचे माजी संपादक मा गो वैद्य यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


द्रष्टे विचारवंत, संपादक, निर्भीड लेखक व जाज्वल्य राष्ट्रप्रेमी मा. गो. वैद्य यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसेच प्रखर लेखणीतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर समाजाचे सातत्यपूर्ण प्रबोधन केले. निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या मा गो वैद्य यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारधन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेचले. ‘तरुण भारत‘चे संपादक असलेल्या वैद्य यांनी पत्रकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांच्या निधनाने विदर्भातील ज्ञानदीप मालविला आहे. वैद्य यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबीयांना कळवितो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


देशासाठी आपले सर्वस्वपणाला लावणारे जेष्ठ विचारवंत हरपले : चंद्रकांत पाटील


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक मा.गो.वैद्य यांच्या निधनामुळे देशेसेवेसाठी संघर्ष करणारे झंझावाती वादळ शांत झाल्याची शोकभावना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, शिक्षक, पत्रकार, विधान परिषद सदस्य असा दांडगा अनुभव मा.गो. वैद्य यांच्या पाठीशी होता. राजकीय जबाबदारी असो वा संघाचे काम, मा गो वैद्य यांनी प्रत्येक भूमिका चोखपणे पार पाडली. देशासाठी आपले सर्वस्व पणाला लावणे ही संघाची शिकवण त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे अंगिकारली होती. अशा या महान विचारवंतांच्या जाण्याने समाजात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांची उणीव नेहमी भासत राहील अशी खंत देखील आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.


देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा स्‍वयंसेवक हरपला : आमदार सुधीर मुनगंटीवार


ज्‍येष्‍ठ विचारवंत व ज्‍येष्‍ठ संपादक मा. गो. वैद्य यांच्‍या निधनाने प्रामाणीक, निस्‍वार्थ भावनेने देशकार्यासाठी आयुष्‍य वेचणारा सच्‍चा संघ स्‍वयंसेवक, हाडाचा पत्रकार हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे आदर्श स्‍वयंसेवक, संस्‍कृत पंडित, शिक्षक, पत्रकार, विधान परिषद सदस्‍य अशा विविध भुमिका मा. गो. वैद्य यांनी यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या. राजकीय क्षेत्र असो वा राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने सोपविलेले कार्य, मिळालेल्‍या प्रत्‍येक जवाबदारीला मा.गो. वैद्य यांनी शतप्रतिशत न्‍याय दिला. संघकार्यासाठी त्‍यांनी आपले आयुष्‍य समर्पित केले. संघाने दिलेली जवाबदारी सांभाळण्‍यात त्‍यांनी स्‍वतःला झोकुन दिले. देश घडविण्‍याचे स्‍वप्‍न उराशी बाळगुन स्‍वयंसेवकांची वाटचाल सुरु असते, अशा स्‍वयंसेवकांमधील एक म्‍हणजे मा.गो. वैद्य होत. या ज्‍येष्‍ठ विचारवंताच्‍या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असेही आ. मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.


संबंधित बातमी : 


राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास