नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा गो वैद्य यांचं निधन झालं. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मा गो वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं.


मॉरिस कॉलेजमध्ये असताना 1943 सालापासूनच मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. 1948 साली गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची श्रद्धांजली


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.


संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते. 'नागपूर तरुण भारत'चे संपादक म्हणून बाबूरांवांचे पत्रकारितेतील योगदान सर्व पत्रकारांना कायम प्रेरणा देणारे राहील. विदर्भात जनसंघ रुजविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.




विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळाले आहेत.

खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती.