दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. परप्रांतियांना झालेल्या मनस्तापाबद्दल राज ठाकरेंना खेद, साध्वी कांचनगिरींची माहिती, तर माफी मागेपर्यंत राज ठाकरेंना यूपीत नो एन्ट्री, बृजभूषण यांचा विरोध कायम 


2. अयोध्या दौऱ्यापूर्वी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ, उद्धव ठाकरेंना करणार लक्ष्य की पुन्हा शरद पवारच रडारवर? याकडे महाराष्ट्राचं लक्ष


Raj Thackeray Pune Rally News Updates : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांची पुण्यात सभा होणार आहे. 21 तारखेला राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची सभा  पुण्यातील भिडे पुलाशेजारी नदीपात्राच्या रस्त्यालगत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सभेला नियम आणि अटी या विषयी पोलिस निर्णय घेतील, पुणे पोलिसांकडून सभेस्थळाची पाहणी करण्यात येत आहे. अर्थात अद्याप अधिकृत घोषणा याबाबत झालेली नाही. मात्र पुण्यातील मनसे सभेला परवानगी नाकारण्याचं काहीच कारण नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळं याठिकाणीच सभा होणार हे निश्चित झालं आहे.


3. प्रलंबित निवडणुका जुलैनंतरच, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगातल्या सूत्रांची माहिती, हवामान विभागाशी चर्चेनंतर निवडणुकांचा कार्यक्रम आखणार



Municipal Elections In Maharashtra: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोबतच इतर प्रलंबित निवडणुका पावसाळ्यापूर्वी पार पडणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. यामध्येच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील सर्व प्रलंबित पालिका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका किमान जुलैपर्यंत होणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुकांसंदर्भात योग्य ती परिस्थिती बघून निर्णय घेतला जाऊ शकतो. यातच मतदान यादी, प्रभाग रचना आणि आरक्षण यासाठी आणखी वेळ लागू शकतो. राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम तारीख जाहीर करण्यापूर्वी हवामान खाते आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करणार आहेत. महापालिका प्रक्रिया जून अखेर तर जिल्हा परिषद पंचायत समितीची संपूर्ण प्रक्रिया जुलैअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. 14 महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समिती निवडणूक प्रलंबित आहेत.


4. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपनं उमेदवार उभा केल्यास चुरस वाढणार, पक्षात आल्यास संभाजीराजेंना उमेदवारी, शिवसेनेतील सूत्रांची माहिती


5. शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी मुंबई पोलीस केतकी चितळेचा ताबा घेण्याची शक्यता, पोलीस कोठडी संपत असल्यानं ठाणे कोर्टात हजेरी


Ketaki Chitale Case Update : राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे (Ketaki Chitale) सध्या ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे. आज तिची पोलीस कोठडी आज संपणार आहे. मागील सुनावणीवेळी केतकीनं वकील घेतला नव्हता. तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीला सुट्टीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर तिनं केलेल्या आक्षेपार्ह्य पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयानं केतकीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 


6. जामीन रद्द करण्याच्या सरकारच्या अर्जावर राणा दाम्पत्य कोर्टात बाजू मांडणार, प्रसारमाध्यमांशी न बोलण्याच्या अटीचा राणांनी भंग केल्याचा सरकारचा दावा


7. पावसाळा तोंडावर आला असतानाही मुंबईत फक्त 40 टक्केच नालेसफाई, पालिका आयुक्तांनी दिलेली 25 तारखेची डेडलाईन गाठणं कठीण


मुंबई : पावसाळा तोंडावर आला असतांना मुंबई शहरातली नालेसफाई अजून गाळातच आहे.  शहर भागात वेळेत नालेसफाई पूर्ण न करणा-या कंत्राटदाराला पालिकेने कारणे दाखवा नोटीस दिली आहे.  मनदीप एंटरप्रायजेस या ठेकेदारानं वेळेत काम पूर्ण न केल्यानं पालिकेनं शहर भागातील नालेसफाई करता आणखी एक कंत्राटदार नेमला आहे.  पूर्व आणि पश्चिम उपनगरांच्या तुलनेत मुंबई शहरातील नालेसफाई धीम्या गतीनं सुरू आहे.


मुंबई शहर भागातील  नालेसफाई 15 मे पर्यंत 50 टक्के पूर्ण होणं गरजेचं होतं. मात्र, वेळेत हे काम पूर्ण न झाल्यानं पालिकेनं  ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून शहर भागासाठी आणखी एक कंत्राटदार नेमला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडून नालेसफाईची डेडलाईन नव्यानं जाहीर करण्यात आली आहे.  सध्याचा कंत्राटदार 50 टक्के काम पूर्ण करेल आणि दुसर्‍या ठेकेदाराने 31 मे पूर्वी उर्वरित 25 टक्के काम पूर्ण करणे अपेक्षित आहे.


8. ज्ञानवापी सर्वेक्षण अहवाल 2 दिवसांत सादर करा, वाराणसी कोर्टाचे आदेश, दोन याचिकांवर आज निर्णय तर शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश


Gyanvapi Mosque Survey : वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीवरून (Gyanvapi Mosque) वाद सुरूच आहे. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र दावे आणि सर्वेक्षणानंतर आता न्यायालयात आणखी एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. आता काशी विश्वनाथ मंदिरातील नंदीसमोरील भिंत तोडली जाणार की, नाही यावर वाराणसी न्यायालय सुनावणी करणार आहे.


भिंत तोडून सर्वेक्षण करण्याची मागणी


ज्ञानवापी मशीद संकुलातील तलावात शिवलिंग सापडल्याच्या दाव्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये विराजमान झालेला नंदी चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ज्याचे तोंड मशिदीच्या तलावाकडे आहे. वाराणसीच्या 3 महिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून सर्वेक्षण पुढे नेण्याची मागणी केली. त्याचबरोबर काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये ज्या ठिकाणी नंदी बसला आहे, ती जागा पाडून तिथे सर्वेक्षण करण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली आहे.


9. पुढचे चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तर खान्देश आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट


10. बातमी आयपीएलची, उमरान मलिकच्या वेगासमोर मुंबईचे फलंदाज ढेर, हैदराबादचा संघ 3 धावांनी विजय