मुंबई : राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाआघाडीत (काँग्रेस + राष्ट्रवादी + शेकाप + इतर मित्रपक्ष) घेण्याची आमची खूप इच्छा होती, परंतु काँग्रेसमुळे घेता आले नाही. त्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाने एकही उमेदवार उभा केला नव्हता. परंतु राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. लावरे तो व्हिडीओच्या माध्यमातून राज यांनी सत्ताधारी भाजपविरोधात प्रचार केला होता.

राज्यभरात 10 मोठ्या जंगी सभा घेऊन राज ठाकरे यांनी मतदारांना भाजप-शिवसेनेविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. स्वाभाविकपणे राज ठाकरे यांच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला. तसेच याकाळात राज ठाकरे सातत्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या संपर्कात होते. त्यामुळे शरद पवार राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु काँग्रेसने त्यास विरोध केल्यामुळे राज ठाकरेंना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढावी लागत आहे.

तोंडी परीक्षेदरम्यान अजित पवार यांना याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाला आघाडीत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. काँग्रेस सोडून इतर मित्रपक्षांचा त्यास पाठींबा होता. परंतु काँग्रेसने मात्र त्यास विरोध केला. राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकांमुळे काँग्रेस राज यांच्यासोबत आघाडी करण्यास तयार नाही.

काँग्रेसला असे वाटते की, जर महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी आघाडी केली, तर त्याचा त्यांना उत्तर भारतात फटका बसेल. कदाचित काँग्रेसला राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात फायदा होईलही, परंतु काँग्रेसचे पारंपरिक उत्तर भारतीय मतदार काँग्रेसवर नाराज होतील, अशी भीती काँग्रेसला वाटते.

...तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार



अजित पवारांनी भरसभेत फोन उचलला, "माईक चालू राहू दे आपलं सगळं उघड असतं" | इंदापूर | ABP Majha



वाचा : ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीची आघाडी, अविनाश जाधवांचा मार्ग मोकळा