रोहा (रायगड) : काका-पुतण्या वाद महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. या वादाशी आता आणखी एक नाव जोडलं गेलंय, ते म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं. तटकरेंचा पुतण्या संदीप तटकरे हे उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.
रायगडमधील रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
संदीप तटकरे कोण आहेत?
संदीप तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांचे सुपुत्र आहेत. शिवाय, आमदार अवधूत तटकरे यांचे संदीप हे बंधू आहेत.
संदीप तटकरे यांचा शिवसेना प्रवेश सुनील तटकरे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. तटकरे घराण्यातच मोठी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवाय, रोहा नगरपालिकेत आता काका विरुद्ध पुतण्या असाच सामना रंगणार आहे.
आतापर्यंत रोहामधील राजकारण तटकरे विरुद्ध सर्व विरोधक असेच राहिले आहे. मात्र, थेट तटकरे कुटुंबच फुटल्याने आता तटकरे विरुद्ध तटकरे असं राजकारणाला नवं रुप मिळणार आहे.