मुंबई : मराठा मोर्चाबद्दल सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मराठा सामाजाचा उद्रेक होऊ शकतो असा सरकारला इशारा देण्यात आला आहे. मराठा समाज मुक्ती मोर्चाच्या आयोजकांनी ही भूमिका घेतली आहे.


आतापर्यंत मराठा मोर्चे शांततेत निघाले आहेत, मात्र सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास मोर्चांचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.

मराठा मोर्चाची कोंडी फोडण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना?

एक पाऊल पुढे टाकून सरकार जिल्हा पातळीवर मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करायला तयार झालं आहे. मराठा मोर्चाची कोंडी सोडवण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.  एक मंत्री आणि दोन विरोधी पक्ष नेते यांचा या गटात समावेश असेल. हा गट जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन मराठा मोर्चा आयोजकांशी चर्चा करेल. यासंदर्भात लवकरच विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करणार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मराठा मोर्चे संपल्यानंतरच या मंत्रीगटाची स्थापना केली जाईल. त्यानंतरच चर्चा होणार असल्याचंही सरकारने सांगितलं. सगळे मोर्चे संपले की मग हे गट जिल्ह्यात जाणार आहेत.

सांगलीत आज मराठा मोर्चा

सांगलीत आज मराठा मोर्चा काढला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1800 पोलिस कर्मचारी, 750 होमगार्ड, एसआरपीएफच्या 4 तुकड्या, असा चोख बंदोबस्त सांगलीत तैनात केला गेला आहे. तसंच सांगली शहरातली वाहतूक सकाळी 6 पासूनच बंद केली गेली आहे.