गांजा पिऊ नकोस, सल्ला देणाऱ्या विद्यार्थ्यावर तरुणाचा हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2016 11:29 PM (IST)
कल्याण : कॉलेजबाहेरील तरुणाला गांजा पिऊ नको असं समजावून सांगणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कल्याणमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अजय भोईर हा विद्यार्थी आणि त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले असून अजयची प्रकृती चिंताजनक आहे. कल्याणमधल्या बिर्ला कॉलेजमध्ये एसवायबीएचं शिक्षण घेणाऱ्या अजयनं कॉलेजच्या बाहेर एका मुलाला गांजा ओढताना पाहिलं. अजयनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं बाचाबाची सुरु केल्यावर अजय तिथून निघाला. काही वेळातच तो गांजा पिणारा मुलगा आपल्या मित्रांसोबत अजयला शोधत चिकनघर परिसरात आला आणि अजयवर थेट चाकूनं वार केले. यावेळी अजयला वाचवण्याचा प्रयत्न करणारे रमेश भोईर आणि रवी निकमही जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र हल्ल्यानंतर हे आठही जण फरार झाले आहेत.