मुंबई : राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Governent Cabinet Meeting) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर सरकारने टोलमाफीचा (Toll waiver in mumbai) निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर) रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या वाहनांना ही टोलमाफी दिली जाणार आहे. दरम्यान, सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारने टोलमाफी दिली आहे, पण ती नेमकी कोणत्या वाहनांसाठी आहे, असे विचारले जात आहे. त्यामुळे सरकारचा हा निर्णय नेमका काय? हे जाणून घेऊ.
सरकारने नेमका काय निर्णय घेतला?
सरकारने मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी दिली आहे. मुंबईच्या वेशीवर एकूण पाच टोल आहेत. या पाचही टोलनाक्यांवर टोल आकारला जातो. आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलूंड टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका असे हे पाच टोलनाके आहेत. या सर्वच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना आता टोलमाफी असेल. अवजड वाहनांना मात्र टोल द्यावा लागेल.
हलकी वाहने म्हणजे काय?
साधारण कार, जीप, ट्रॅक्टर आदी वाहनांना हलकी वाहने म्हटले जाते. ज्या वाहनांचे सरासरी वजन 7500 किलोग्रॅमच्या वर नसते, अशा वाहनांचा हलकी वाहनांमध्ये समावेश होतो.
धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा
राज्य सरकारने मुंबईशी संबंधित आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील 125 एकर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडची ही 125 एकर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात येईल. मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोरिवलीची जागा दिल्यानंतर या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावी पुनर्विकासाची जबाबदारी अदाणी उद्योग समूहावर देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार