Mumbai-Pune Expressway Travel Will Become More Expensive: 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा (Mumbai-Pune Expressway) प्रवास आणखी महागणार आहे. कारण 1 एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. 2004 साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Pune Expressway) टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसी कडून सांगण्यात आलं. 

पुणे (Pune News) मुंबई (Mumbai News) या दोन शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2030 पर्यंत पुणे-मुंबई प्रवासासाठी टोलचे दर खालीलप्रमाणे :

वाहन  आत्ताचे दर  1 एप्रिलपासूनचे दर 
चारचाकी 270 320
टेम्पो 420 495
ट्रक 580 685
बस 797 940
थ्री एक्सेल 1380 1630
एम एक्सेल 1835 2165

वेग सुसाट मात्र अपघात फारच 

दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग सुसाट गतीने धावतो, मात्र त्याच तुलनेत या मार्गावर अपघाताची मालिकादेखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. अनेकदा मोठ-मोठ्या अपघातांमुळे या मार्गावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अनेकांची कुटुंब उध्वस्त झाली आहेत. मात्र तरीही योग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अपघाताचं सत्र कधी संपणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारल्या जात आहे. 

विनायक मेटेंच्या निधनानंतर 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' चर्चेत

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा 'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'वर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. हा पहिलाच मृत्यू नाहीतर या आधी अनेकांनी या ठिकाणी जीव गमावला आहे. अपघात झाल्यास वाहतूक कोंडीमुळे या मर्गावर रुग्णवाहिका पोहचण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे अनेकदा रुग्णांना वेळेवर उपचार करणं शक्य होत नाही. त्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त असते.