पुणे : तब्बल साडे सात वर्षांपासून पुणे-सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम रखडलेलं असतानाही टोलवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काम रखडलेलं असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी अगोदरच त्रास सहन करत होते. त्यात आता टोलचा भुर्दंडही वाढला आहे.


पुणे ते सातारा दरम्यानच्या 140 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचं काम तब्ब्ल साडे सात वर्ष रखडलं. अनेक अपघात या रस्त्यावर घडतात. असं असतानाही या रस्त्यावर वसूल केल्या जाणाऱ्या टोलमध्ये पुढील महिन्यापासून वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींच्या खात्याने घेतला आहे.

पुणे ते सातारा दरम्यानच्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आलं आणि ऑक्टोबर 2010 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार हे काम मार्च 2013 मध्ये पूर्ण होणार होतं. मात्र आतापर्यंत पाच वर्षात पाचवेळा मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण होऊ शकलेलं नाही.

काम राखडलेलं असताना या रस्त्यावरील खेड-शिवापूर आणि आणेवाडी या दोन टोल नाक्यांवरील टोल वसुलीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरींनी कामं रखडवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची घोषणा केली होती. मात्र काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला टोल वाढीचं घसघशीत बक्षीस गडकरींच्या खात्याकडून देण्यात आलं आहे.