मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना विधान परिषदेत आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. कधी नव्हे ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली.


अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना धनंजय मुंडे म्हणाले की, अंगणवाडी सेविकांमुळे कुपोषण कमी झालं आहे. त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे.

त्यावर पंकजांनीही कुपोषण कमी झाल्याची कबुली दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे आभार मानले. ''कुपोषण वाढलं असल्याचं सांगत नेहमी टीका होते. मात्र कधी नव्हे ते माझ्या खात्याचं या सभागृहात कौतुक केल्याबद्दल आभार मानते,'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांनीही यावर लगेच उत्तर दिलं. ''मन मोठं करुन माझे आभार मानले. तसंच अंगणवाडी सेविकांचं मानधनही 10 हजार रुपये करावं, मन मोठं करावं,'' अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

एकमेकांवर नेहमी टोकाची टीका करणाऱ्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांच्या कौतुकाची भाषा केली. त्यामुळे काही वेळासाठी सभागृहात कधीही न पाहिलेलं चित्र निर्माण झालं होतं.

दरम्यान, अंगणवाडी सेविकांचं आंदोलन दाबण्यासाठी त्यांच्यावर मेस्मा लावण्यात येत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. मात्र मेस्मा लावण्याचा निर्णय हा अन्यायकारक नाही. कुपोषित बाळाला दोन ते तीन दिवस पोषण आहार भेटला नाही, तर मृत्यूचं संकट ओढावतं. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.

संबंधित बातम्या :

विरोधीपक्ष आणि पालकमंत्री एकत्र आल्यास महालक्ष्मीची पूजा करेन : चंद्रकांत पाटील


अंगणवाडी सेविकांच्या निवृत्तीचं वय 65 वर्षे : पंकजा मुंडे