मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
 
आजपासून निवडणूक आयोगात ठाकरे विरुद्ध शिंदे


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना कोणाची अशी लढाई निवडणूक आयोगापुढे सुरू होणार आहे. आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटात सामन्याचा नवा अंक रंगणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे.  तर दोन्ही गटांना बाजू मांडण्यासाठी 8 ऑगस्ट दुपारी 1 वाजेपर्यंतची वेळ मिळाली होती.


 संजय राऊतांना जेल मिळणार की बेल? 


पत्रा चाळ  घोटाळ्याप्रकरणी राऊता ईडीच्या अटकेत आहेत. 31 जुलै रोजी अनेक तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर न्यायलयाने राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. राऊतांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. शनिवारी वर्षा राऊत यांचीही जवळपास 10 तास ईडीकडून चौकशी झाली.
 
राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता 


कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसाठी 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तिन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भात 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार तर 10 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 


मुख्यमंत्री नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत.  


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. मागचे तीन आठवडे महागाई आणि ईडी कारवाई विरोधात दोन्ही सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही.