मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार


सध्या गोव्यातल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणारे शिंदे समर्थक आमदार आज मुंबईत परतणार आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आज हे आमदार मुंबईत येतील. 3 आणि 4 जुलैला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी हे आमदार येत आहेत. कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे. त्यांना मुंबईत ऑबेरॉय हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. 


एकनाथ शिंदेंविरोधात कारवाई, शिवसेना नेतेपदावरुन काढलं


पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. 


विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार


 सध्या राष्ट्रवादीच्या वतीने संख्याबळ जास्त असल्यामुळे आमचाच विरोधी पक्ष नेता असेल असा मोठया प्रमाणात दावा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी पक्षनेते पदासाठी जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
 
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस


आज दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, महाविकास आघाडी आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.  
 
राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी लिस्ट पाठवली जाणार


राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदार नवी लिस्ट पाठवली जाणार आहे.  महाविकास आघाडीने 12 राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी लिस्ट पाठवली होती. ती विद्यमान राज्यपाल कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती. आता नवं सरकार नवी लिस्ट पाठवणार आहे. 



पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट


 कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा असल्यानं चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


आषाढी वारी


आज ज्ञानेश्वरांची पालखी फलटण मुक्कामी राहणार आहे.  तुकारामांची पालखी निमगाव केतकीहून निघेल आणि इंदापूरला मुक्कामी असेल.