Todays Headline 29th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 


टेंभी नाक्याच्या देवीची आजची आरती कोण करणार? 


 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रश्मी उद्धव ठाकरे टेंभी नाक्यावरच्या देवीची आरती करायला जाणार आहेत.    यावेळी शिंदे गट आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी एकमेकांसमोर येऊ शकतात.  कारण मीनाक्षी शिंदे यांची आज आरतीची वेळ नियोजित आहे. अशात संध्याकाळी रश्मी ठाकरे पोहचल्यानंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसाच्या सूरत आणि भावनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध योजनांचा शुभारंभ करणार आहेत. सकाळी 8.30 वाजता दिल्लीहून रवाना होतील.   संध्याकाळी 7 वाजता 36 व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे


 तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार 


तिरुपती देवस्थानकडून आज अंबाबाईसाठी मानाचा शालू येणार आहे. मिलिंद नार्वेकर हे आज अंबाबाईला तिरुपतीचा शालू घेऊन येणार आहेत. या शालूला खूप महत्त्व असून नवरात्रीनंतर लिलावात लाखो रुपयांची बोली लागते.


केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर


केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात विविध कार्यक्रमात पदाधिकारी मेळाव्यासह व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता नेवासा येथे देवगड देवस्थान दर्शन करून श्रीरामपूर तालुक्यात दौरा करणार आहेत.


  भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन


 भारत विकास परिषदेचे पश्चिम क्षेत्रीय संमेलन आज नागपुरात होणार आहे. या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी करणार असून समारोपाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत. देशातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांचे हे संमेलन आहे. 


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर 


    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 6 वाजता अमरावतीचे बसपाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार हे बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहे. त्यानंतर नवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.


 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर 


  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातून जाणारी आगामी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या मार्गाची पाहणी आज करणार आहेत