Todays Headline 27th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राच्या दृष्टीने निर्णायक दिवस असेल. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आला आहे त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल.
संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. राऊतांच्या जामीनाला ईडीचा तीव्र विरोध आहे. संजय राऊतच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ईडीचा आरोप आहे. संजय राऊतांना कोर्टापुढे हजर केलं जाणार आहे.
अनिल देशमुख आज हायकोर्टात जामीनासाठीच्या याचिकेवर सुनावणीची मागणी करणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अनिल देशमुख आजच हायकोर्टात जामीनासाठीच्या याचिकेवर सुनावणीची मागणी करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं निर्देश देऊनही काही कारणास्तव हायकोर्टातील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचे देशमुखांच्या जामीनावर याच आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
आरे कारशेडसंदर्भातली सुनवाणी आज सर्वोच्च न्यायालयात
आरे कारशेडसंदर्भातली सुनवाणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. मागील महिन्यात सुनावणी जैसे थे परिस्थिती ठेवत पुढे ढकलण्यात आली होती. कारशेडचं काम जोरदार सुरु असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत पर्यावरणवाद्यांच्या हाती काय लागतं? हे बघणं महत्त्वाचे असेल.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून दोन दिवस अकोल्याच्या दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्यापासून दोन दिवस अकोल्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीच्या आढाव्यासाठी हा दौरा असणार आहे. यासोबतच पक्ष संघटन मजबूतासाठीही या दौऱ्यात ते चर्चा करणार आहेत