Todays Headline: राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी नव्यानं तपास सुरू केला आहे. त्यासंबंधित आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील चिंदरगाव आजपासून तीन दिवस सुट्टीवर जाणार आहे. चिंदरगावात गावपळण केली जाते. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
राहुल गांधी यांची आज शेगावमध्ये सभा, सोनिया गांधी उपस्थित राहणार
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज देशातील 72 वा तर राज्यातील 12 वा दिवस आहे. त्यांच्या यात्रेला आज सकाळी 6 वाजता कुपट बालापूर येथून सुरवात होईल. राहुल गांधीची यात्रा आज बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यावेळी वरखेड येथे स्वागत केलं जाणार आहे. दुपारी 3.45 वाजता शेगाव गजानन महाराजारांचे ते दर्शन घेणार आहेत. संध्याकाळी 6.30 वाजता शेगाव या ठिकाणी त्यांची जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधी यांच्या या सभेला सोनिया गांधी या उपस्थित राहणार आहेत. आजच्या या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत.
मालवणमधील चिंदरगाव आजपासून तीन दिवस सुट्टीवर जाणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील चिंदरगाव आजपासून तीन दिवस सुट्टीवर जाणार आहे. चिंदरगावात गावपळण केली जाते. या काळात गावच्या वेशीबाहेर राहूट्या उभारून गावकरी रहात असतात. या गावची गावपळणची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासमोरील अडचणी वाढणार?
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी 'क्लीन चीट' देणाऱ्या मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी नव्यानं तपास सुरू केला आहे. तशी माहिती इओडब्ल्यूतर्फे मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली असून यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.
किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्या मालमत्तेबाबत खुलासा करणार आहेत. दुपारी 1 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
सुषमा अंधारेंची संदिपान भुमरेंच्या मतदारसंघात सभा
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यात सभा होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजता त्या सभा घेणार आहेत.