Pandharpur mauli corridor Planning: ABP माझाच्या बातमीनंतर माऊली कॉरिडॉर आणि विकास आराखड्याबाबत बैठकीसाठी आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आज संतप्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून बनविण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून राबविला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिली. दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या 15 दिवसात देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांना दिल्यावर शासनाचा आराखडा आणि नागरिकांचा आराखडा हे दोन्ही समोर ठेऊन निर्णय घेऊ असे सांगितले. 


हा कॉरिडॉर अथवा शहरातील विकास आराखडा हा भविष्याचा विचार करून केला जाणार असल्याचे सांगताना यात विस्थापित होणाऱ्यांसाठी चांगले पॅकेज देण्याचाही प्रयत्न असल्याचे सांगत मधाचे बोट लावले आहे . यापूर्वी वाराणसी अथवा उज्जैन अशा ठिकाणी झालेल्या कॉरिडॉरला तेथील व्यापारी अथवा नागरिकांनी विरोध केल्याचे समोर आले नसून त्याच धर्तीवर येथील व्यापारी आणि नागरिकांना चांगला मोबदला देत त्यांना विश्वासात घेऊन आराखडा राबविण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगितले. 


ज्यावेळी तो टप्पा येईल त्यावेळी विस्थापित होणारे व्यापारी आणि नागरिकांचे एक बोर्ड बनवून पुढील चर्चा होईल असे संकेत दिले . एकंदर पालकमंत्र्यांनी आज यात राजकारण करणाऱ्यांना बाजूला ठेवण्यासाठी मोठ्या पॅकेजचा उल्लेख केला असून आता नागरिक 15 दिवसात कसा आराखडा देतात आणि शासन नेमके कोणते पॅकेज देणार यावर या कॉरिडॉर आणि विकास आराखड्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे. 


तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पोलिसांसाठी अद्ययावत निवासी संकुल उभारणार : पालकमंत्री


तीर्थक्षेत्र ठिकाणी पोलिसांसाठी निवासी संकुल उभारणार असून पोलीस स्टेशन अद्ययावत करणार असल्याची घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. पोलिसांनी लोकप्रतिनिधीच्या बरोबर योग्य समन्वय करून काम केले पाहिजे. जनतेतून लोकप्रतिनिधींना निवडून दिले जाते त्यामुळे जनता प्रश्न विचारत असते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. मंगळवेढा येथील नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.  पोलीस विभागात होणारा बदल कौतुकास्पद आहे. जेवढे कार्यालये हे चांगले तितकेच काम चांगले झाले पाहिजे. पूर्वी कार्यालयात अधिकारी बसत नव्हते त्यांना आता नविन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र बातमी कळत आहे. त्यामुळे लोकांनी सत्यता पडताळणी करून घेतली पाहिजे. पोलिसांना आता अत्याधुनिक शस्त्रे दिली जात आहे. सायबर क्राईमच्या अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत.  सध्या भीमा नदीतून बेसुमार वाळू उपसा होत आहे. याला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत. आमच्या सरकारने मोठी पोलीस भरती काढली आहे. त्यामुळे तरुणांना आता हक्काची नोकरी मिळणार आहे. लोकांची अडचण न होता लोकांची सोय झाली पाहिजे.  सगळीकडे आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे घरी बसून तक्रार दाखल करता येईल.पोलीस अधीक्षक यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी विशेष मोहीम राबवावी तर आपण लोकांचे सेवक आहोत. पोलिसांनीही भान ठेवून काम केले पाहिजे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


ही बातमी देखील वाचा


पंढरपूर विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉर वादात अडकणार, मनसे हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत