मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
समृद्धी महामार्गाचा मुहूर्त अखेर 15 ऑगस्टला
नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग 15 ऑगस्टला सुरु होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. शनिवारी कुर्ल्यात मंगेश कुडाळकर यांनी आयोजित केलेल्या एका सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आलं होतं.
काँग्रेसची आजपासून दोन दिवस महत्वाची बैठक
राष्ट्रपती निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगच्या अनुषंगाने आज काँग्रेसची महत्वाची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश, एच के पाटील आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.
आरे कारशेडविरोधात पुन्हा पर्यावरणवाद्यांचं आंदोलन
आरेत मेट्रो कारशेड वळवण्याच्या हालचाली सुरु झाल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील वादात उडी घेत पर्यावरणवाद्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. आज पुन्हा पर्यावरणवादी आरे परिसरात निषेध आंदोलन करणार आहे.
भाजप आणि शिवसेना गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची एकत्र बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील. सर्व आमदारांसोबत स्नेहभोजन होणार आहे.
नीटची आज परीक्षा
नीटची परीक्षा आज होणार आहे. एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या नीट परीक्षेसाठी वीस मिनिटे वेळ वाढवून दिला आहे. देशातील 547 शहरांमध्ये मराठी इंग्रजीसह 13 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. देशभरातील जवळपास 18लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील. दुपारी 2 ते 5.20 दरम्यान ही परीक्षा होईल
आयसीएससी दहावीचा आज निकाल
आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. सेमिस्टर एक आणि सेमिस्टर असं दोन समान महत्त्व देऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता हा निकाल जाहीर केला जाणार आहे. अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी त्यांचा रोल नंबर टाकून हा निकाल पाहू शकणार आहेत. तसेच मार्कशीट डाऊनलोडही करू शकणार आहेत.
कास धरण 100 टक्के भरलं
सातारा- सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे आणि कास धरणाची उंची वाढवल्यानंतर ते पहिल्यांदाच 100 टक्के भरले असून आता या नव्याने बांधण्यात आलेल्या या कास धरणाचे पाणी आता बाहेर पडायला सुरवात झाली आहे.
चिपळूणमध्ये जिल्हास्तरीय भातशेती नांगरणी स्पर्धा
रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील पालवण गावात जिल्हास्तरीय भातशेती नांगरणी स्पर्धा आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील अनेक बैलजोड्या उपस्थित असणार आहेत. सर्जा राजाचा शेतातील खेळ पाहण्यासाठी शेकडो शेतकरी उपस्थित राहतील.
एनडीएची आज बैठक
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएची बैठक आज होणार आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे.