मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


पुढील 48 तासांत राज्यात जोरदार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी
राज्यात पुढच्या 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे..


कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?


रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे
ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर
यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली


उद्धव ठाकरे घेणार जिल्हाप्रमुखांची बैठक
शिवसेनेपासून शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने बैठका घेत आहेत. आज दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात होणार आहे.


एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू आज मुंबईत 
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रोपदी मूर्मु आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदार सोबत त्यांची बैठक होणार आहे. ही बैठक अंधेरी येथील हॉटेल लीला येथे होणार आहे. 


पावसाच्या अलर्टमुळे पुणे, ठाणे, रायगड, नवी मुंबईतील शाळा बंद
पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा 17 जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवी मुंबईतील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढला
अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील वाढत असलेल्या पावसाचा अंदाज घेऊन अलमट्टी धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवल्यामुळे सांगली, कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र धरणाच्या पुढील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


महाबळेश्वरातून कोकणाकडे जाणारा आंबेनळी घाट आज बंद 
महाबळेश्वरातून कोकणाकडे जाणाऱ्या आंबेनळी घाट आज बंद रहाणार आहे. घाटात तुरळक पडलेले दरडी आणि पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर आलेले दगडधोंडे बाजूला काढण्यासाठी घाट बंद रहाणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठीही घाटातील धोकादायक दरडी हटवल्या जणार आहेत. यासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घाट बंद रहाणार आहे. 


भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरा सामना
भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला आहे.