Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  


अंधेरी पूर्वेत आज महाशक्तीप्रदर्शन, ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करणार


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचा उमेदवार ठरले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांच्यात लढत होणार आहे. उद्धव गट आणि भाजपसाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्धव गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून आज मुरजी पटेल उमेदवारी अर्ज दाखल करतील. या वेळी दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. 


 ऋतुजा लटकेंना आज राजीनाम्याचं पत्र मिळणार


शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यानी महापालिकेतील आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा आज सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार ऋतुजा लटके यांना आज त्यांच्या राजीनाम्याचं पत्र मिळण्याची शक्यता आहे. 


सेनेच्या फायरब्रॅंड नेत्यांवर गुन्हे दाखल 


महाप्रबोधन यात्रेत केलेल्या भाषणांवरुन सेनेच्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, अनिता बिर्जे या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या भाषणात आक्षेपार्ह उल्लेख असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्याच्या विविध भागात हे गुन्हे दाखल झाले आहेत.


अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी 


अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सीबीआय कोर्टात आज सुनावणी होणार आहे. ईडीकडून अनिल देशमुखांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता सीबीआय कोर्टात अनिल देशमुखांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. 


ईडी आणि सीबीआय संचालकांच्या कार्यकाळाच्या याचिकेवर आज सुनावणी 


ईडी आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाळ पाच वर्ष वाढवण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.