On this day in history 14 October : 14 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. 14 ऑक्टोबर 1964 रोजी मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना अहिंसेच्या सिद्धांतांचं पालन करत रंगभेदाविरुद्ध संघर्षासाठी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर याच दिवशी वेगवेगळ्या वर्षी र धो कर्वे, न चिं केळकर, लालचंद दोशी, दत्तोपंत ठेंगडी या दिग्गजांचं निधन झालं होतं...


जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं होतं...


1956 - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली (Dr B.R. Ambedkar converts to Buddhism along with followers)


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला 'दीक्षाभूमी' असंही म्हणतात. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी अनुयायी मोठ्या संख्येनं इथं येतात. दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी आणि शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होतं. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. भारतासह जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांतील बौद्ध उपासक, भिक्खूही इथे उपस्थित राहतात.


1964 - मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना नोबेल शांती पुरस्कार (Martin Luther King, Jr)


14 ऑक्टोबर 1964 रोजी मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना अहिंसेच्या सिद्धांतांचं पालन करत रंगभेदाविरुद्ध संघर्षासाठी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला.  मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनियर यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी झाला तर मृत्यू 4 एप्रिल 1968 हे एक अमेरिकन सुधारक आणि धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.


1981 - भारताचा माजी क्रिकेटपटू तथा खासदार गौतम गंभीर यांचा जन्मदिवस (Gautam Gambhir Birthday) 


भारताचा माजी क्रिकेटपटू आणि 2007 आणि 2011 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा शिलेदार खासदार गौतम गंभीरचा आज वाढदिवस. गौतम गंभीरचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 रोजी झाला होता.  गंभीरने वयाच्या दहाव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांनी मॉर्डन स्कूल, नवी दिल्ली आणि नंतरचे शिक्षण हिंदू कॉलेजमध्ये पूर्ण केले. 2000 साली त्याची बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी निवड झाली. डावखुरा गौतम गंभीर सलामीवीर फलंदाज होता. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून मोलाची कामगिरी केली आहे. 2003 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतरच्याच वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. 2007 टी 20 वर्ल्डकपच्या फायनल्समध्ये भारताने विजय मिळवला. या सामन्यात गंभीरनं 54  चेंडूत 75 धावा केल्या होत्या. तर 2011 च्या वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये त्यानं 112 चेंडूत 97 धावांची महत्वाची खेळी केली होती. 2008  मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2009 मध्ये आय.सी.सी. कसोटी क्रमवारीत तो जगातील नंबर एकचा फलंदाज ठरला. त्याच वर्षी त्याला आय.सी.सी. टेस्ट प्लेअर ऑफ द इयर पुरस्कारही देण्यात आला.2011 च्या आयपीएलच्या लिलावात गंभीरला सर्वाधिक पसंती देण्यात आली होती. गंभीरच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव करून चॅम्पियन्सला पहिले जेतेपद मिळवून दिले. क्रिकेट सोडल्यानंतर त्यानं राजकारणाच्या मैदानातही बाजी मारली. तो सध्या भाजपकडून दिल्लीतून लोकसभेवर खासदार आहे. 


2010 : 19 व्या राष्ट्रकुल खेळांचा समारोप 


14 ऑक्टोबर हा दिवस भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं महत्वाचा. 19 व्या राष्ट्रकुल खेळांचा समारोप याच दिवशी झाला होता. 19 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 3 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2010 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडल्या. 1982 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी यजमानपदाच्या जवळपास तीन दशकांनंतर भारताने इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. खेळाच्या आयोजनासाठी संपूर्ण दिल्लीत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 14 ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा समारोप झाला होता. 


1953- अग्रणी समाजसुधारक र धो कर्वे यांचा मृत्यू (Ra Dho Karve)


महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा 14 ऑक्टोबर 1953 रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म मुरुड-रत्‍नागिरी येथे 14 जानेवारी 1882 साली झाला होता.  ते धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होते सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. र. धों. कर्वे यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली. तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहून दिला.  एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. दुर्दैवाने ती केस ते केस हरले पण तरीही त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.  रघुनाथ धोंडो कर्वे यांनी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या  रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सतत 27 वर्ष एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.


2004 - कामगार चळवळीचे नेते दत्तोपंत ठेंगडींचं निधन ( Dattopant Thengdi)


भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, स्वदेशी जागरण मंच इत्यादी संस्थांचे संस्थापक दत्तोपंत बापूराव ठेंगडी यांचा 14 ऑक्टोबर 2004 साली मृत्यू झाला. ते मराठी कामगार चळवळकर्ते, हिंदू तत्त्वचिंतक, राजकारणी होते.  दत्तोपंतांचा जन्म 10 नोव्हेंबर 1920 रोजी, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झाला. 15 व्या वर्षापासूनच त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत हे गोळवलकर गुरुजींच्या घरीच निवासाला होते. साहजिकच त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. 1955 साली भोपाळ येथे दत्तोपंतांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली आणि कामगार क्षेत्रात नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. सामाजिक आणि कामगार क्षेत्रात बहुमोल कार्य केल्याबद्दल भारत सरकारने दत्तोपंतांना 'पद्मभूषण' ही उपाधी देण्याची घोषणा केली. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना 'भारतरत्‍न' उपाधी देऊन सम्मानित केले जात नाही, तोपर्यंत आपण दिलेली उपाधी मला स्वीकारता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. दत्तोपंत 1964 ते 1976 या कार्यकाळात खासदार होते. 


1993- वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष पद्मश्री लालचंद दोशी यांचा मृत्यू (Lalchand Dhoshi) 

14 ऑक्टोबर 1993 रोजी  वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष पद्मश्री लालचंद दोशी यांचा मृत्यू झाला. आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक वालचंद हिराचंद दोशी यांचे लालचंद हे भाऊ. वालचंदांच्या पश्चात सबंध उद्योगसमूहाचा कार्यभार लालचंद यांनी कौशल्याने व समर्थपणे सांभाळला आणि पुढे उद्योगसमूहाचा विस्तार-विकासही घडवून आणला. 1993 मध्ये लालचंद ह्यांचे निधन झाल्यानंतर हा उद्योगसमूह दोशी घराण्याच्या नंतरच्या पिढ्यांनी सांभाळला. 


1947-  साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचं निधन (N C Kelkar Marathi Writer)


मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांनी दीर्घ लेखन केलं. लोकमान्यांचे चरित्र (3 खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह 8 कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जायचे. तात्यासाहेबांचे घराणे रत्‍नागिरीजवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार, मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. 1887  साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला. मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळक यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर 1897 सालापासून संपादक झाले. 1935 ते 1947 या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात आली. 1918 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1925 साली मध्य पुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले.  केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.