मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune expressway) बोरघाट (Borghat) येथे नऊ वाहनांचा विचित्र अपघात झालाय. सोमवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झालाय. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने नऊ वाहनांचा अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना घडली नाही. परंतु, दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय.
मुंबई- पुणे महामार्गावर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरघाटात विचित्र अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा ढेकू गावाच्या हद्दीतील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने नऊ वाहनांना धडक दिली.
भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर या कारने एसटी बस आणि इतर सात वाहनांना धडक दिली. यात एसटी बसला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला आहे. याचवेळी मागून आलेल्या भरधाव वाहनांनी एकमेकांना धडक दिल्याने या अपघातात सुमारे दहा वाहनांचे नुकसान झाले आहे.
महामार्गावरील वाहतून विस्कळीत
या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ विस्कळीत झाली होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावरील आयआरबी, देवदूत यंत्रणा यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूत सुरळीत झाली. बोरघाट पोलिसांनी देखील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
दोन प्रवाशी जखमी
या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी कारमधील दोन ते तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आलेले गुरुनाथ साठीलकर यांनी दिली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावरील अपघातांची मालिका अद्याप सुरूच असल्याचे दिसून आले आहे.
अपघाताची मालिका सुरूच
मंबई-पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे याच मार्गावर अपघाती निधन होऊन नुकताच महिना उलटला आहे. त्या पूर्वी देखील या महामार्गावर अनेक मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या