मुंबई: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत. तर अफझल खानच्या कबरीवरील केलेल्या कारवाईविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करत ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावरही आज सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत, आदित्य ठाकरे सामिल होणार


राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील पाचवा दिवस असून ही यात्रा हिंगोलीत दाखल होणार आहे. दुपारी 3 वाजता चोरंबा फाटा येथून ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात प्रवेश करेल या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे स्वागत केले जाईल. जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.


अफझल खान कबर अतिक्रमण कारवाईविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


गुरुवारी राज्य सरकारनं अफझल खानच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमणावर कारवाई केली होती. त्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 


संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी


शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ शकली नव्हती. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती.


जॅकलिनच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल


सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामीन अर्जावर आज निकाल लागणार आहे. याप्रकरणी गुरुवारी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. या दरम्यान ईडीने सांगितले की, जॅकलिनविरोधात पुरेसे पुरावे आहेत, त्यामुळे तिला नियमित जामीन देऊ नये.


वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी आज आंदोलन 


वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भातील खासदारांच्या घरासमोर विदर्भवाद्यांकडून आज घेराव घातला जाणार आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या घराजवळही विदर्भवादी आंदोलन करणार आहेत. चंद्रपुरात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी खासदार बाळू धानोरकर यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे.


अजित पवार आज तळेगाव दाभाडे येथील कार्यक्रमांना उपस्थिती लावणार  


राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार  पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे येथे टीजीएच ऑन्को-लाईफ कॅन्सर सेंटरचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर इंद्रायणी भात खरेदीचा शुभारंभ त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. अजित पवार शिर्डी अधिवेशनात शरद पवार आले त्यादिवशी उपस्थित नव्हते. तसेच सुप्रिया सुळेंबाबत सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावरही ते बोलले नव्हते. त्यानंतर ते प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत.