मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू
लालबागच्या राजाचे विसर्जन
मुंबईतील नवसाचा गणपती अशी ओळख असणारा लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी 10.30 वाजता निघाली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांची अलोट अशी गर्दी लोटलीय.. भक्तांच्या जनसागरामुळे गणपती बाप्पाच्या पुढच्या मिरवणुकीला मात्र उशीर होतोय. लालबागच्या राजाचे सकाळी 7 वाजता विसर्जन होण्याची शक्यता आहे
पंतप्रधान 'केंद्र-राज्य विज्ञान परिषदे' चे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. 10-11 सप्टेंबर 2022 रोजी सायन्स सिटी, अहमदाबाद येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रिन्स चार्ल्स नवे महाराज
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) द्वितीय यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं. वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके एलिझाबेथ द्वितीय विराजमान होत्या. महाराणी एलिजाबेथ यांनी 70 वर्ष सिंहासनाची धुरा सांभाळली. आता त्यांच्या निधनानंतर शाही परिवारात सत्तांतरण कसं होणार याकडे लक्ष लागून आहे. महाराणी एलिजाबेथ यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स यांच्याकडे येणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता नवीन महाराज म्हणून घोषणा करण्यात येणार आहे.
कॉंग्रेसचे गुजरात बंदचे आवाहन
काँग्रेसने (Congress) महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन उद्या गुजरात बंदचे आवाहन केले आहे. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला सुरुवात
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) इंडिया लिजेंड्सचं नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे, या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh) हरभजन सिंह आणि पठाण बंधू यांच्यासह सर्व माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात दिसतील. भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, बांग्लादेश आणि श्रीलंकेचे माजी खेळाडू मैदानात दम दाखवतील. इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे.
आजपासून पितृपक्ष पंधरवडा
हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. आणि पुढे तो 15 दिवस चालतो. आजपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे.