Ganesh Chaturthi 2022 : अंबरनाथमध्ये (Ambernath) गणपती बाप्पासमोर ठेवलेल्या मोदकाचा तब्बल एक लाख रुपयांना लिलाव करण्यात आला आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या खाटूश्याम मित्र मंडळाने आपली अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत हा लिलाव केला. यावर्षी सीमा सच्चिदानंद राय यांनी हा मोदक लिलावात विकत घेतला. यासाठी त्यांनी 1 लाख 1 हजार रूपये मोजले.
खाटूश्याम मित्रमंडळाकडून अंबरनाथच्या बुवापाडा परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव ( Ganesh Chaturthi 2022 ) साजरा केला जातो. या मंडळाकडून दरवर्षी अनंत चतुर्दशीला दोन दिवस आधी एक मोठा मोदक गणपती बाप्पाजवळ ठेवला जातो. या मोदकाचा अनंत दतुर्दशी दिवशी लिलाव केला जातो. त्याप्रमाणे आज गणपतीच्या मोदकाचा लिलाव करण्यात आला. यावेळी या मोदकाचा लिलाव तब्बल एक लाख रूपयांना झाला.
कोरोनापूर्वी 2019 ला या मोदकाचा 92 हजार रुपयांना लिलाव झाला होता. तर यंदाच्या वर्षी या मोदकाची बोली 41 हजार रुपयांपासून सुरू झाली आणि अखेर 1 लाख 1 हजार रुपयांना या मोदकाचा लिलाव झाला. यावर्षी सीमा सच्चिदानंद राय यांनी हा मोदक लिलावात विकत घेतला. हा मोदक घेतल्याने वर्षभर सुख समृद्धी राहते आणि काहीही कमी पडत नसल्याची अनुभूती येत असल्याचं सीमा सच्चिदानंद राय यांचा मुलगा रोशन राय याने सांगितलं. तर यंदाच्या वर्षी मोदकाच्या लिलावाने एक लाख रुपयांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचल्याचं खाटूश्याम मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी सांगितलं.
दहा दिवसाच्या पूजा विधीनंतर आज सर्वत्रच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. राज्यातील विविध भागात आज मोठा पाऊस झाला आहे. परंतु, अशा पावसात देखील भाविकांनी बाप्पाला भिजत-भिजत निरोप दिला. ठिकठिकाणी मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या. गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. अंबरनाथच्या खाटूश्याम मित्रमंडळाच्या बाप्पाला देखील आज निरोप देण्यात आला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरती झाल्यानंतर बाप्पाचे विसर्जन करण्यात आल्याचे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोदकुमार चौबे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या