नागपूर : रविवारी 11 सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील चार हजारावर निवडणूक केंद्रामध्ये निवडणूक कार्ड सोबत आधार जोडणी अभियानासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नव मतदारांना नोंदणी करणे, नाव वगळणे, यासाठी सुद्धा प्रत्येक केंद्रावर कर्मचारी रविवारच्या दिवशी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर यांनी केले आहे.


लोकशाही यंत्रणेत जबाबदार नागरिक म्हणून आपल्या आधार कार्डची जोडणी निवडणूक कार्ड सोबत करणे आवश्यक आहे.याशिवाय निवडणूक यादीमध्ये आपले नाव तपासून घेणे, तसेच नव्याने नाव टाकणे, वगळणे यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. नागपूर महानगरातील प्रत्येक निवडणूक केंद्रावर तसेच प्रत्येक गावातील शाळांमध्ये निवडणूक केंद्रांवर ही मोहीम असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


गावात लावा 'लाऊडस्पिकर'


महानगरपालिका क्षेत्र व जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण तसेच गावात ग्रामपंचायतीद्वारे या संदर्भातला प्रचार प्रसार करण्यात यावा. तसेच लाऊडस्पिकर्स असणाऱ्या गावांमध्ये याबाबत गावकऱ्यांना अवगत करावे, दवंडी दयावी,असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेव्दारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी जोडण्याकरीता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून एच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करणे बाबत कार्यक्रम घोषित केलेला आहे.


साडेचार लाख मतदारांनी केली 'लिंकिंग'


मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांकाची जोडणीची सुरुवात ऑगस्टपासून करण्यात आली होती. नागपूर जिल्हयातील 12 विधानसभा मतदार संघा अंतर्गत 6 सप्टेंबरपर्यंत एकूण 4,33,368 मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्राशी आधार क्रमांकाची जोडणी केलेली आहे. भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानूसार रविवारी मतदार ओळखपत्राशी आधार जोडणी कार्यक्रमा बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमे अंतर्गत नागपूर जिल्हयातील एकूण 4432 मतदान केंद्रावर नमुना 6 ब, नमुना क्र. 6, 7, 8 सह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहे.


यादीत नाव असलेल्यांना करता येईल 'लिंकिंग'


मतदार यादीत नाव असलेल्या मतदारास आपले आधार लिंक करायचे असल्यास सदर मतदाराने नमुना 6 ब भरुन तसेच ज्या पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव नाही अशा मतदारांनी नमुना क्र. 6, ज्यांना नाव वगळायचे आहेत त्यांनी नमुना 7 व ज्यांच्या नावामध्ये दुरुस्ती आहे किंवा ज्यांना पत्यामध्ये बदल करायचा आहे त्यांनी नमुना 8 आवश्यक कागदपत्रासह जवळच्या मतदान केंद्रावर सादर करावा किंवा ऑनलाईन नमुना 6 ब, नमुना 6, 7 व 8 भरायचा असल्यास nvsp.in, voterportal, voter helpline app या माध्यमांचा वापर करावा.मतदारांकडे आधार क्रमांक नसल्यास अर्ज क्र. 6 ब मध्ये दर्शविलेल्या 11 पर्यायी कागदपत्रापैकी एक कागदपत्र सादर करता येईल उदा. पॅनकार्ड, फोटोसहीत किसान पासबुक, पासपोर्ट, इपिक कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटोसहीत पेन्शन कागदपत्रे, केंद्र/राज्य शासन कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, समाजिक न्याय विभागातील ओळखपत्र नमुना क्र. 6ब सह देता येईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Pollution Control : प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करा , औष्णिक वीज प्रकल्पांना दोन वर्षांची मुदतवाढ


Smuggling gold : चक्क हातोड्यातून सोन्याची तस्करी, नागपूर विमानतळावरुन तिघांना अटक