कोल्हापूर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना केंद्र सरकारनं दिलेलं 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही याबाबात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साशंकता व्यक्त केली आहे. कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पवारांनी मोदींवरही निशाणा साधला. मोदींनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. 5 राज्यांचा निवडणूक निकाल पाहाता, लोकांना बदल हवा असल्याचंही पवार म्हणाले


खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना दिलेल्या आरक्षणावर शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा निर्णय नेमका कोणासाठी घेतला आहे? कायद्यात हे आरक्षण टिकणार नसल्याचं घटनातज्ज्ञांचं मत आहे.  50 टक्क्यांच्या वर आरक्षण टिकणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं यापूर्वीचं स्पष्ट केलं आहे. घटनादुरुस्ती केल्याचं सरकार सांगत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणाच्या ढाच्यात बदल करता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.


येत्या 8 दिवसात जागावाटपाचा प्रश्न सुटेल


काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबच चर्चा सुरु असल्याची माहिती पवारांनी यावेळी दिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाली त्यावेळी जागावाटपासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांचा विषय थोडा लांब ठेवला आहे.


लोकसभेच्या 48 जागांपैकी तीन जागांचा तिढा कायम असून त्याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पैकी बहुमत कोणाला मिळतं हे तपासण्याचं सुरु आहे. येत्या 8 दिवसात जागावाटपाचा प्रश्न सुटेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून याठिकाणी प्रभावी उमेदवार दिला जाईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.


पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल पाहता देशात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. लोक अस्वस्थ झाले आहेत. भाजप सरकारने साडेचार वर्षात जनेतेला अनेस आश्वासनं दिली, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने जनता नाराज आहे, अशी टीका शरद पवारांनी मोदी सरकारवर केली.