अहमदनगर : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज त्यांच्या पत्नीसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यानंतर विखे पाटलांनी उपस्थितांना विचारले की, 'कोणतं दाबायचं?' त्यांच्या या मिश्किल सवालामुळे मोठा हास्यकल्लोळ उडाला होता.

देशभरात 71 मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांसह कलाकार, खेळाडू आणि अनेक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

VIDEO | राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला | एबीपी माझा



अहमदनगर दक्षिण मतदार संघावरुन विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वाद झाला होता, असे बोलले जाते. त्यामुळे विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळवली. मुलगा भाजपत गेल्यामुळे विखेंच्या पक्षनिष्ठेवर पक्षातील लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

काही दिवसांपूर्वी विखेंनी अहमदनगरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. तिथे विखेंनी शिवसेना उमेदवारासाठी भाषणही केले. शिवसेना नेत्यांनी विेखेंना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तर भाजपवासी असलेले विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी राधाकृष्ण विखे भाजपात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विखेंच्या राजकीय भूमिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशा परिस्थिती विखेंनी आज मतदान केंद्रावर उपस्थितांना विचारलेल्या 'कोणतं दाबायचं? या प्रश्नानंतर मोठा हास्यकल्लोळ झाला.

दरम्यान, मतदानानंतर विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याच्या भूमिकेवर बोलण्यास विखेंनी नकार दिला.

VIDEO | सुजयला राष्ट्रवादीत जाण्याची राहुल गांधींची सूचना धक्कादायक: राधाकृष्ण विखे पाटील | अहमदनगर | एबीपी माझा